ग्रामीण रुग्णालयात पदभरतीला शासनाची मंजुरी : आ. संजय बनसोडे
लातूर, 25 जून (हिं.स.) : वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय लवकरच सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सुरु होणार असून, या रुग्णालयातील आवश्यक पदभरती प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यासाठी शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे
संजय बनसोडे


लातूर, 25 जून (हिं.स.) : वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय लवकरच सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सुरु होणार असून, या रुग्णालयातील आवश्यक पदभरती प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यासाठी शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली. या उपक्रमामुळे वाढवणा तसेच परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी अनेकदा तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. ही अडचण लक्षात घेऊन आ.संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली.

त्यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे आता पदभरतीला मान्यता मिळाली असुन आता हे रुग्णालय अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची पदभरती लवकरच करण्यात येणार आहे.

आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, वाढवणा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी गट-अ, वर्ग-२, अधिपरिचारीका,क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ लिपिक वर्ग-३, टंकलेखक वर्ग-३, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्षसेवक, शिपाई, सफाईगार, वाहनचालक आदी पदे शासनाच्या वतीने भरण्यात येणार आहेत.

हे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर प्राथमिक उपचारांपासून ते विविध आरोग्य सेवांपर्यंत सर्व सुविधा स्थानिक नागरिकांना एकाच ठिकाणी मिळतील. विशेषतः माता-बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, तपासण्या आणि नियमित वैद्यकीय सल्ला यांचा मोठा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे.

या रुग्णालयामुळे परिसरातील सर्वसामान्य, शेतकरी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि सुलभ होतील. शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

वाढवणा ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या सुरूवातीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande