
परभणी, 26 जून (हिं.स.) : मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या वाढीव टप्पावाढ अनुदानासाठी शिक्षकांच्या आंदोलनाला गती मिळत असून, शिक्षक समन्वय संघ, परभणी यांनी या लढ्याला राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन आंदोलनात प्रत्यक्ष सहभागाची मागणी केली. शिष्टमंडळाशी संवाद साधताना आमदार पवार यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत 1 जुलै रोजी आझाद मैदानावर उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले.
मी 1 जुलै रोजी आझाद मैदानावर येत आहे. तुम्हीही मोठ्या ताकदीने सहभागी व्हा, ही लढाई तुमची आहे असे ते म्हणाले.
शिष्टमंडळात प्रा. सी. एम. गोंडाणे, सद्दाम बागवान, प्रा. जे. व्ही. भगस, प्रा. गजानन कुलकर्णी, प्रा. विशाल जाधव यांसह अनेक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, संघटनेने राज्यातील टप्पा अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “केवळ निवेदने नव्हे, तर प्रत्यक्ष उपस्थितीनेच संघर्षाला बळ मिळेल,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis