
लातूर, 26 जून (हिं.स.) :
कर्नाटकच्या सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धडकनाळ (बोरगाव) येथील ओढ्याला अचानक पूर आला. ओढ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली.
पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
गेल्या वर्षी याच ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मोठा अपघात घडला होता. त्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाल्याने आज परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने आज कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली असून पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याचे सांगितले. ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची मागणी
स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
ओढ्यावर मोठ्या व्यासाचे सिमेंटचे पाईप बसवावेत
पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी
पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने बांधकाम विभागाने काम सुरू करावे
नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नाही तर भविष्यात गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis