
आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिक, 25 जून (हिं.स.)।
: नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी तसेच अर्भक अतिदक्षता विभाग (N.I.C.U.) सुरू करण्यासाठी १०५ खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असून हे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच अनुषंगाने दिनांक १६ जून २०२६ रोजी माननीय प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार फरांदे यांनी दोन्ही रुग्णालयांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच तातडीने पदनिर्मिती करण्याची मागणी केली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक २४ जून २०२६ रोजी शासन निर्णय क्रमांक पदनि-२०२५/प्र.क्र.१०९/पासु-२ जारी करून राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नव्याने निर्माण अथवा श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे.
या शासन निर्णयानुसार संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक (105 खाटा) येथे कर्करोग विभाग, न्युरो भिषक व न्युरोसर्जरी विभाग, हृदयरोग विभाग, प्लास्टिक सर्जरी, क्ष-किरण विभाग, शरीरविकृती विभाग, शुश्रूषा विभाग तसेच विविध अवैद्यकीय विभागांसाठी एकूण ९५ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच १०० खाटांचे स्त्री रुग्णालय, नाशिक येथे वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, परिचारिका, तंत्रज्ञ, प्रशासकीय व सहाय्यक कर्मचारी अशा विविध संवर्गातील ९७ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या पदनिर्मितीमुळे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील महिला, बालक तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरीब नागरिकांना मुंबई-पुण्यासारख्या महानगरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कर्करोग, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग उपचार तसेच अर्भक अतिदक्षता सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने पदनिर्मितीस मंजुरी दिल्याबद्दल आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब , सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री प्रकाश अबिटकर साहेब तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांचे आभार मानले असून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पुढील पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV