नागपूर : एसआयआरमध्ये एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही – जिल्हाधिकारी
नागपूर, २५ जून (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठी ‘विशेष सखोल पुनरिक्षण २०२६’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) तीन वेळा भ
प्रतिकात्मक छायाचित्र


नागपूर, २५ जून (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठी ‘विशेष सखोल पुनरिक्षण २०२६’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) तीन वेळा भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सदर येथील नियोजन भवनात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. रचना इंदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, २० जून ते २९ जून हा कालावधी बीएलओंचे प्रशिक्षण आणि गणना प्रपत्रांच्या मुद्रणासाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर ३० जून ते २९ जुलैदरम्यान जिल्ह्यातील ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदारांपर्यंत ४,६१० मतदान केंद्रांवरील बीएलओ प्रत्यक्ष घरी जाऊन माहिती संकलित करतील.

मतदारांना ‘Enumeration Form’ भरून देणे आवश्यक असून, या फॉर्मवर मतदाराची विद्यमान माहिती, छायाचित्र, QR कोड तसेच संबंधित बीएलओचे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद असेल. मतदारांनी आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह हा फॉर्म बीएलओकडे परत जमा करायचा आहे.

ज्या मतदारांचे नाव २००२ आणि २०२४ या दोन्ही मतदार याद्यांमध्ये आहे, त्यांनी २००२ मधील मतदार यादीची माहिती नमूद करणे आवश्यक राहील. तर १९८७ नंतर जन्मलेल्या आणि २००२ च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांनी आपल्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीची मतदार यादीतील माहिती द्यावी लागणार आहे.

याशिवाय मतदारांना जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पालक किंवा पती-पत्नीचे नाव व EPIC क्रमांक यांसारखी उपलब्ध माहिती भरावी लागणार आहे.

प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती नोंदविता येतील. प्राप्त हरकतींवर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरदरम्यान सुनावणी घेऊन निर्णय करण्यात येणार आहे.

मतदारांना स्वतःची नोंद तपासण्यासाठी आणि ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची मतदार सेवा वेबसाइट उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पात्र मतदाराला पुरेशी संधी देऊनच अंतिम मतदार यादी तयार केली जाणार असून, कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेतून वंचित राहणार नाही.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande