
नागपूर, 25 जून (हिं.स.) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत कृषी अवजारे बँकेच्या स्थापनेसाठी ऑनलाइन सोडत प्रक्रियेद्वारे ६३ महिला बचत गटांची निवड करण्यात आली. पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी चालना मिळणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पुरस्कृत महिला बचत गटांमधून पात्र गटांची निवड करण्यात आली. शेतकरी भवन येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ही ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया पार पडली.
या सोडतीचे आयोजन नागपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय येळे, पोकरा प्रकल्पाचे नोडल अधिकारी सागर कांबळे, ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) श्रीमती पटोले, ‘माविम’चे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे तसेच जिल्हा प्रकल्प सल्लागार मयुर गड्डमवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प कक्षातील मानव संसाधन विशेषज्ञ अक्षय चांभारे, प्रापण विशेषज्ञ बिलाल काझी, कृषी व्यवसाय विशेषज्ञ हेमचंद गुप्ता आणि अभिषेक पाटील यांनी सहकार्य केले.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला बचत गटांना कृषी अवजारे उपलब्ध होणार असून, शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण महिलांच्या उत्पन्नवाढीस आणि आर्थिक स्वावलंबनास बळकटी मिळणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव