
परभणी, 25 जून (हिं.स.) : प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चे आयोजन 28 जून रोजी परभणी शहर व परिसरातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी नोंदणी केली असून पेपर-1 आणि पेपर-2 साठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पेपर-1 साठी 17 केंद्रांवर एकूण 5,807 परीक्षार्थी तर पेपर-2 साठी 23 केंद्रांवर 7,287 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
परीक्षार्थींनी पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजता आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजता केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात 10.10 नंतर आणि दुपारच्या सत्रात 2.10 नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रांवर आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि फ्रिस्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची छायाप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
मोबाईल फोन, पेजर, डिजिटल घड्याळ, पेन तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी लेखनिकाची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. लेखनिक इयत्ता 12 वी पेक्षा जास्त शिक्षित नसावा, त्याचे वय 19 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच तो परीक्षार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नसावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. अचानक लेखनिकास परवानगी दिली जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis