
लातूर, 26 जून (हिं.स.) :लातूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक, साठवणूक आणि विक्रीविरोधात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मुरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत 1 लाख 34 हजार रुपये किमतीचा अवैध देशी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 26 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 9.20 वाजता अंकोली परिसरात मारुती सुझुकी अल्टो (क्रमांक MH-24 C-7954) मधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुरूड पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनातून 90 एमएल क्षमतेच्या ‘सिमला संत्रा’ आणि ‘टँगो पंच’ ब्रँडच्या एकूण 1,600 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत सुमारे 64 हजार रुपये असून, 70 हजार रुपये किमतीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एकूण 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेश लक्ष्मण गायकवाड (24, चालक, रा. खंडापूर) आणि महादेव शंकर गायकवाड (42, मजुरी, रा. खंडापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात कोणताही वैध परवाना नसताना आर्थिक फायद्यासाठी अवैध दारूची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ)(ई), 81 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू असून पोलीस अमलदार माने हे प्रकरणाचा तपास करत आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis