कुंभमेळ्यासाठी रिंग रोड भूसंपादनाला वेग; वरवंडीत 0.30 हेक्टर जमिनीची थेट खरेदी पूर्ण
नाशिक, 27 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा-2027 साठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविध
Land acquisition process


नाशिक, 27 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा-2027 साठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने करण्यात येणाऱ्या भूसंपादनात दिंडोरी तालुक्यातील मौजे वरवंडी येथील 0.30 हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

प्रस्तावित परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी मौजे वरवंडी येथील बाळकृष्ण पांडुरंग जाधव, चंद्रभान पांडुरंग जाधव, कैलास पांडुरंग जाधव तसेच कल्पना संजय बनकर यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या गट क्रमांक 95, 115 व 222 मधील एकूण 0.30 हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या खरेदी प्रक्रियेसाठी बाळकृष्ण पांडुरंग जाधव यांच्या पत्नी मीराबाई जाधव, त्यांच्या सहा मुली, एक मुलगा तसेच चंद्रभान पांडुरंग जाधव, कैलास पांडुरंग जाधव आणि कल्पना संजय बनकर यांच्या परिवारातील सदस्यांसह एकूण 19 जण उपस्थित होते. संबंधितांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य केले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्यावतीने कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली. शासनाच्या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेस सहकार्य करून खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाधव कुटुंबाचे अभिनंदन केले.

शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहभागामुळे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने पुढे सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande