
बीएलए नियुक्तीचे राजकीय पक्षांना आवाहन
नाशिक, 27 जून (हिं.स.)।
,. भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देणार आहेत. राजकीय पक्षांनीही बूथ लेव्हल असिस्टंटची (BLA) नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतून मतदार यादीतील दुबार, मृत आणि कायमचे स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळणे, बोगस मतदारांची नावे वगळणे, मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे, अपात्र किंवा परदेशी नागरिकांचा समावेश रोखणे, नवीन आणि पात्र मतदारांचा समावेश करणे, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा मूळ उद्देश आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीतील मतदारांच्या नोंदी अचूक होण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने देखील बूथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
चौकट
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम असा
विशेष सखोल पुनरीक्षणासाठी अर्हता दिनांक : १ ऑक्टोबर २०२६. तयारी, प्रशिक्षण व छपाई : २० ते २९ जून २०२६. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी- ३० जून ते २९ जुलै २०२६. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण : २९ जुलै २०२६ पर्यंत. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी : ५ ऑगस्ट २०२६. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६. नोटीस टप्पा, दावे व हरकती निकालात काढणे : ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६. अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी : ७ ऑक्टोबर २०२६.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV