
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । भगवतीनगर, निवेंडी (ता. रत्नागिरी) येथे खेळता खेळता विहिरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३, रा. दहिसर, मुंबई) असे त्या चिमुरडीचे आहे. स्वरा आपल्या आई-वडिलांसह आणि नातेवाईकांसोबत कोकणात पर्यटनासाठी आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सायंकाळी स्वरा घराच्या अंगणात इतर मुलांसोबत खेळत होती. काही वेळानंतर ती दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, स्वराचे मामा ओंकार भोईर यांनी घराजवळील विहिरीत पाहिले असता स्वरा पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.
स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तिला मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती मरण पावल्याचे घोषित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी