
चंद्रपूर, 04 जून (हिं.स.)। विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यंकर शाळेजवळ पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी खोदून ठेवलेला महाकाय व जीवघेणा खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा किंवा तेथील बांधकाम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त टाले यांना निवेदन देण्यात आले. पुढील ७ दिवसांत प्रशासनाने यावर ठोस कारवाई न केल्यास त्या खड्ड्यात उभे राहून उपोषण छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.
विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यंकर शाळेचा परिसर अत्यंत वर्दळीचा असून लहान मुलांच्या व नागरिकांच्या येण्या-जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. या ठिकाणी पाण्याच्या टाकीसाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे, मात्र प्रदीर्घ काळापासून हे काम रखडलेले असून खड्डा तसाच उघड्या व असुरक्षित अवस्थेत पडलेला आहे. मनपाच्या या ढिसाळ आणि संथ कारभारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला असून, पाऊस सुरू होताच या खड्ड्यात पाणी साचेल. शाळा जवळच असल्याने लहान मुले, पादचारी आणि वाहनचालक यांना पाण्याचा अंदाज न आल्यास येथे एखादी मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाने पुढील ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी किंवा तो खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करावा. या मुदतीत कारवाई न झाल्यास प्रभागातील संतप्त नागरिकांसह मनपा समोर तीव्र उपोषण करण्यात येईल आणि या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी काँग्रेस नेते बलवीर सिंग, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राधा पुलगमकर, प्रफुल पुलगमकर, अतुल पिंपळकर, मनिष दास, गुंजन येरमे, अतुल ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव