
पुणे, 04 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हवामान कृतीसाठी जागतिक आवाहन’ या महत्त्वपूर्ण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे लोकल सेंटर यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन) आणि इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन – पुणे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा रविवार, ७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथील अभियंता भवनातील फिरोदिया हॉल येथे होणार असून, पर्यावरण संवर्धन, हवामान बदल, जलव्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते होणार आहे. हवामान बदलामुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध स्तरांवर प्रभावी कृती आराखडे तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यशाळेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, शासकीय अधिकारी, संशोधक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हवामान बदलाचे परिणाम, जलस्रोतांचे संवर्धन, पर्यावरणपूरक विकास धोरणे तसेच शाश्वत जीवनशैली यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जागतिक स्तरावर हवामान बदलाचा वाढता प्रभाव लक्षात घेता समाजातील विविध घटकांना एकत्र आणून पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचा संदेश या कार्यशाळेतून दिला जाणार आहे. तसेच पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांमध्ये विचारमंथन होणार आहे.
कार्यशाळेस इच्छुक नागरिक, विद्यार्थी, अभियंते आणि पर्यावरण विषयात रस असलेल्या व्यक्तींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संयोजक इंजी. राजेंद्र माहुलकर (९८२२७७३०२०) किंवा फरीद शेख (९८२२७५४१६५) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटरचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय एस. बोरमणे, मानद सचिव इंजी. हर्षवर्धन के. देवकाते आणि संयोजक इंजी. राजेंद्र माहुलकर यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु