
तेहरान, 27 जुलै (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रविवारी कॅस्पियन समुद्रातील एका इराणी व्यापारी जहाजावर झालेल्या कथित युक्रेनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी इशारा दिला की ही घटना दुर्लक्षित केली जाणार नाही आणि त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.
अराघची यांनी युक्रेनवर संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी दावा केला की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी इराणी जहाजावरील हल्ल्याचे आदेश दिले होते. या हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी म्हटले. अराघची यांनी आरोप केला की हा हल्ला इस्रायलच्या सांगण्यावरून करण्यात आला, ज्याचा उद्देश युरोपला युद्धात ओढणे हा होता.ते म्हणाले, “झेलेन्स्की यांनी एका इराणी व्यापारी जहाजावर हल्ला केला, ज्यामध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला. हा संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचा उघड उल्लंघन आहे. तसेच, युरोपला युद्धात सामील करण्यासाठी इस्रायलच्या सूचनेवरून हा हल्ला करण्यात आला.”
युरोपियन संघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया कॅलस आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण स्पष्ट केले आहे की कीवमधील सत्ताधाऱ्यांची ही कृती कोणत्याही उत्तराविना सोडली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी इराणने तेहरानमधील युक्रेनच्या प्रभारी राजदूताला बोलावून या घटनेबाबत अधिकृत निषेध नोंदवला होता.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, इराणचे सहायक परराष्ट्रमंत्री आणि युरेशिया विषयांचे महासंचालक मनुचेहर मुरादी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी इराणी व्यापारी जहाजावरील हल्ल्याला “शत्रुत्वपूर्ण आणि गुन्हेगारी कृत्य” असे संबोधले. मुरादी म्हणाले की, हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत नमूद केलेल्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन आहे. त्यांनी याला आक्रमक कारवाई ठरवत सांगितले की यामुळे सर्व किनारी देशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे.या घटनेसाठी युक्रेनला जबाबदार धरले पाहिजे आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केले की देशाच्या सुरक्षेचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. मंत्रालयाने म्हटले की, इराणी नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेवर झालेल्या हल्ल्यांना योग्य उत्तर दिले जाईल.
इराणची ही प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या त्या विधानानंतर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियातील लष्करी तळांशी संबंधित लक्ष्यांवर दूरपल्ल्याचे हल्ले केल्याचा दावा केला होता. यामध्ये कॅस्पियन समुद्र परिसरातील कारवायांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode