
जेरुसलेम , 27 जुलै (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कला जाणार असल्याची पुष्टी केली आहे. यावेळी त्यांनी न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यावरही तीव्र टीका केली. नेतान्याहू यांनी ममदानी यांच्यावर ज्यूविरोधी भावना भडकवण्याचा आणि शहरात फूट पाडण्याचा आरोप केला.
रविवारी दिलेल्या एका मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले, “ममदानी यांना माझे उत्तर असे आहे की, मी ज्यू समाजाच्या सत्यासाठी लढण्यासाठी न्यूयॉर्कला येणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून सत्य मांडणे, इस्रायल आणि इस्रायल-अमेरिका मैत्रीपूर्ण संबंधांच्या समर्थनार्थ बोलणे, हा माझा उद्देश आहे.” यावेळी नेतान्याहू यांनी ममदानी यांच्यावर हमासच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केल्याचा आरोपही केला.
ते म्हणाले, “ममदानी नेमके कुणाचा पाठिंबा करत आहेत? त्यांच्या पत्नीने आणि कुटुंबीयांनी ७ ऑक्टोबरच्या नरसंहाराचा आनंद साजरा केला. होलोकॉस्टनंतर ज्यू समाजाविरुद्ध झालेला हा सर्वात भीषण नरसंहार होता. ते प्रत्यक्षात हमासच्या त्या दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत, ज्यांनी आमच्या महिलांवर अत्याचार केले, त्यांची हत्या केली, मुलांना जिवंत जाळले, आमच्या नागरिकांची कत्तल केली आणि २५१ लोकांना ओलीस ठेवले.”
दरम्यान जुलैच्या सुरुवातीला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी म्हटले होते की, बेंजामिन नेतान्याहू न्यूयॉर्कला आल्यास त्यांना अटक करण्याच्या मुद्द्यावर ते आणि शहराचा विधी विभाग विचार करत आहेत. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. इस्रायलने या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसेच अमेरिकेतील सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनीही ममदानी यांच्यावर टीका केली होती.
मात्र, त्यानंतर ममदानी यांनी आपल्या भूमिकेत बदल करत स्पष्ट केले की, “आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (आयसीसी) अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा स्वतंत्र कायदेशीर अधिकार आमच्याकडे नाही. मात्र, हा अधिकार अमेरिकेच्या संघीय सरकारकडे आहे आणि त्यांनी आयसीसी सोबत सहकार्य करून हे अटक वॉरंट लागू करावे, अशी माझी मागणी आहे.” उल्लेखनीय म्हणजे, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने (आयसीसी) नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
न्यूयॉर्कमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक करण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी नेतान्याहूंना उद्देशून म्हटले होते, “तुम्ही अमेरिकेत असताना कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अटक केली जाणार नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode