लेबनानमधील हिजबुल्लाह लढवय्यांचे संरक्षण करणे आमची जबाबदारी- मोजतबा खामेनेई
तेहरान, 27 जुलै (हिं.स.)।मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी म्हटले की, लेबनानमधील हिजबुल्लाह लढवय्यांचे संरक्षण करणे ही इराणची धोरणात्मक जबाबदारी आहे. तसेच, अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्
लेबनानमधील हिजबुल्लाह लढवय्यांचे संरक्षण करणे आमची जबाबदारी- मोजतबा खामेनेई


तेहरान, 27 जुलै (हिं.स.)।मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी म्हटले की, लेबनानमधील हिजबुल्लाह लढवय्यांचे संरक्षण करणे ही इराणची धोरणात्मक जबाबदारी आहे. तसेच, अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी होणाऱ्या कोणत्याही कराराची अट अशीच असेल की इस्रायलने लेबनानवरील हल्ले पूर्णपणे आणि कोणत्याही अटींशिवाय थांबवावेत.

खामेनेई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर हिजबुल्लाहचे सरचिटणीस शेख नईम कासिम आणि संघटनेच्या लढवय्यांकडून पाठविण्यात आलेल्या निष्ठापत्राला उत्तर दिले. त्यांनी हिजबुल्लाहच्या लढवय्यांच्या संयम, त्याग आणि शौर्याचे कौतुक करत संघटनेला इस्रायलविरोधातील प्रतिकाराची ‘आघाडीवरील अढळ भिंत’ असे संबोधले.

आपल्या संदेशात खामेनेई म्हणाले की, पुढे जाण्याचा मार्ग केवळ जिहाद आणि प्रतिकार हाच आहे. सातत्याने संघर्ष करणाऱ्यांना दैवी विजय मिळतो आणि सत्याच्या बाजूने लढणाऱ्यांचा शेवटी विजय होतो, असा दावा त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण हिजबुल्लाह आणि लेबनानच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करणे ही आपली धोरणात्मक जबाबदारी मानते. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या या “लादलेल्या युद्धाचा” अंत करणाऱ्या कोणत्याही करारामध्ये इस्रायलने लेबनानवरील सर्व लष्करी कारवाया थांबवणे आवश्यक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोजतबा खामेनेई यांनी दक्षिण लेबनानमधील नागरिकांच्या संयमाचे आणि पाठिंब्याचेही कौतुक केले. त्यांनी हिजबुल्लाहचे दिवंगत प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह आणि प्रतिकार चळवळीतील इतर कमांडरांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, हिजबुल्लाहच्या लढवय्यांनी या संघटनेला एका छोट्या रोपट्यापासून विशाल आणि मजबूत वृक्षामध्ये रूपांतरित केले असून संपूर्ण इस्लामी जगतात लेबनानचा सन्मान वाढवला आहे.

खामेनेई यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा मध्य पूर्वेत तणाव सातत्याने वाढत आहे. या विधानाकडे हिजबुल्लाहप्रती इराणच्या राजकीय आणि वैचारिक पाठिंब्याचा स्पष्ट संदेश म्हणून पाहिले जात आहे. तसेच, कोणताही व्यापक करार इस्रायलने लेबनानमधील लष्करी कारवाया थांबवणे आणि लेबनानची प्रादेशिक अखंडता कायम राखणे यांच्याशी जोडूनच इराण पाहत असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी लेबनानचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले होते की, देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि लेबनान सरकारला संपूर्ण देशात आपला अधिकार प्रस्थापित करता यावा यासाठी इस्रायली सैन्याने लेबनानी भूभागातून पूर्णपणे माघार घेणे आवश्यक आहे. दोन्ही नेत्यांच्या पहिल्या भेटीत इराणसमर्थित हिजबुल्लाहचे निःशस्त्रीकरण, इस्रायली सैन्याची माघार, लेबनानी सैन्याला अमेरिकेची मदत, देशाचा पुनर्निर्माण कार्यक्रम, आर्थिक सुधारणा आणि अमेरिकन गुंतवणूक यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande