
मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असून बुधवारी शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जून महिन्याचा बहुतांश काळ कोरडा गेल्यानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि उत्तर कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून शनिवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने आगामी काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत जोर कायम ठेवला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आणि वाहतुकीवर परिणाम झाला. अंधेरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, दादर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर आणि बोरिवली परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अंधेरी येथील भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. अंधेरी पश्चिमेतील जे. पी. रोड, लोखंडवाला सर्कल तसेच आरटीओ परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आरटीओ परिसरात गुलमोहराचे झाड कोसळल्याची घटनाही घडली. मागील २४ तासांत काही भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून मानखुर्द येथे १७० मिमी, चेंबूरमध्ये १६९ मिमी, गोवंडीत १६३ मिमी, भायखळ्यात १६२ मिमी, मुंबई सेंट्रलमध्ये १४२ मिमी, वांद्रे-कुर्ला संकुलात १३२ मिमी, बोरीवलीत १२६ मिमी, लोअर परळमध्ये १२५.४ मिमी आणि दिंडोशीत १२३ मिमी पाऊस नोंदवण्यात आला.
मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेलाही बसला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या १० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. पावसामुळे रेल्वेमार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला. परिणामी सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानके आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सीएसएमटी ते कल्याण मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे, तर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बर मार्गावरील लोकलही सुमारे १० मिनिटे उशिराने धावत होत्या, तर वातानुकूलित लोकल सेवाही मोठ्या विलंबाने सुरू होत्या.
हार्बर मार्गावरील नेरुळ येथे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पहाटे लोकल सेवा काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि सुमारे ५३ मिनिटांनंतर सेवा पूर्ववत करण्यात आली. या बिघाडामुळे पहाटेच्या अनेक लोकल गाड्या बराच वेळ उशिराने धावल्या. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर जखमी माकड आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचारी आणि प्राणीप्रेमींच्या मदतीने माकडाला सुरक्षितपणे हटविल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule