जूनमध्ये जीएसटी महसूल संकलनात 13.9 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)। देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलनात वाढ नोंदविण्यात आली आहे. जून महिन्यात एकूण जीएसटी महसूल संकलनात वार्षिक 13.9 टक्क्यांची वाढ होऊन ते सुमारे 1.95 लाख कोटी रुपये झाले. यापूर्वी मे महिन्यात जीएसटी महसूल सं
Gst


नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)। देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलनात वाढ नोंदविण्यात आली आहे. जून महिन्यात एकूण जीएसटी महसूल संकलनात वार्षिक 13.9 टक्क्यांची वाढ होऊन ते सुमारे 1.95 लाख कोटी रुपये झाले. यापूर्वी मे महिन्यात जीएसटी महसूल संकलनात 3.2 टक्क्यांची वाढ होऊन ते 1.94 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले होते.

जीएसटी महासंचालनालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात 1,94,812 कोटी रुपयांचे (सुमारे 1.95 लाख कोटी रुपये) जीएसटी संकलन झाले. मागील वर्षी याच महिन्यात 1,71,105 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. त्यामुळे वार्षिक आधारावर जीएसटी महसूल संकलनात 13.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारे एकूण जीएसटी उत्पन्न 6.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.35 लाख कोटी रुपये झाले, तर आयातीमधून मिळणारा महसूल 34.6 टक्क्यांनी वाढून 60,038 कोटी रुपये झाला. जून महिन्यात एकूण परतावा (रिफंड) 29.1 टक्क्यांनी वाढून 32,436 कोटी रुपये झाला.

चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये जीएसटी महसूल संकलनात 8.4 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण 6,31,699 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा महसूल 5,82,542 कोटी रुपये होता.

जीएसटी महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, परताव्याची (रिफंड) रक्कम वजा केल्यानंतर जून महिन्यातील निव्वळ जीएसटी महसूल संकलन 11.2 टक्क्यांनी वाढून 1.62 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

दरम्यान, देशात 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू करण्यात आली होती. आज या करप्रणालीला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande