
नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)। अदानी समूहाची अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) ही 20 गिगावॅट (GW) कार्यरत नवीकरणीय ऊर्जा क्षमता ओलांडणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने हा टप्पा प्रामुख्याने नव्या (ग्रीनफिल्ड) प्रकल्पांच्या विकासाद्वारे गाठला आहे. सध्या कंपनी दरवर्षी 52 अब्ज युनिटांहून अधिक स्वच्छ विजेचे उत्पादन करते.
अदानी समूहाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे उत्पादन भारताच्या एकूण वीज वापराच्या सुमारे तीन टक्के आहे. ही वीज न्यूयॉर्क शहराची वर्षभराची वीज गरज भागविण्यास किंवा मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही शहरांच्या एकत्रित वार्षिक वीज गरजेइतकी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 5,051 मेगावॅट नव्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेची भर घातली. चीनबाहेरील कोणत्याही कंपनीने एका वर्षात उभारलेली ही सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या यशाबद्दल एजीईएलचे कार्यकारी संचालक सागर अदानी म्हणाले की, 20 गिगावॅट क्षमतेचा टप्पा पार करणे हे शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून काय साध्य करता येते, याचे उदाहरण आहे. त्यांनी सांगितले की, एजीईएल आज आपल्या कुशल कर्मचाऱ्यांच्या आणि दीर्घकाळापासून जोडलेल्या भागीदारांच्या सहकार्याने मुंबई आणि नवी दिल्लीच्या एकत्रित वार्षिक वीज गरजेइतकी नवीकरणीय वीज उपलब्ध करून देत आहे.
एजीईएलची आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 10 गिगावॅट-तास (GWh) बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता उभारण्याची आणि पुढील पाच वर्षांत ती वाढवून 50 गिगावॅट-तास करण्याची योजना आहे. त्यामुळे कंपनीला 2030 पर्यंत 50 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठण्याच्या उद्दिष्टात मदत होणार आहे.
एजीईएल ही भारतातील सर्वात मोठ्या आणि जगातील आघाडीच्या नवीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रिडशी जोडलेले सौर, पवन, हायब्रिड आणि ऊर्जा साठवण प्रकल्प विकसित करणे, त्यांची मालकी राखणे आणि त्यांचे संचालन करणे हे कंपनीचे प्रमुख कार्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule