
जेलरोड परिसरातील आढाव मळ्यातील दुर्दैवी घटना
नाशिक, 01 जुलै (हिं.स.)। जेलरोड परिसरातील आढाव मळा येथे बुधवारी (दि. १) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. विद्युत खांबावरील बिघाड दुरुस्त करत असताना अचानक हायव्होल्टेज करंट लागून महावितरणच्या एका २८ वर्षीय तरुण तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्यावर सध्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जय मुकुंद सकट (वय २८, रा. साईनाथ नगर, जेलरोड) असे मृत पावलेल्या तरुण तंत्रज्ञाचे नाव आहे. तर राजेश सुरेश चौरे (रा. जत्रा हॉटेल परिसर) असे गंभीर जखमी झालेल्या तंत्रज्ञाचे नाव आहे. हे दोघेही महावितरणच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत होते.
...आणि घात झाला!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीपासून आढाव मळा, पिंटो कॉलनी परिसरातील विद्युत खांबाद्वारे मोठ्या प्रमाणात ठिणग्या आणि ज्वाळा बाहेर पडत होत्या. यामुळे परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर बुधवारी दुपारी बिघाड दुरुस्त करण्यासाठी जय सकट आणि राजेश चौरे हे दोघे खांबावर चढले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक खांबामध्ये जोरदार विद्युत प्रवाह उतरला. या भीषण धक्क्यामुळे दोघेही थेट खांबावरून खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जय सकट यांची प्राणज्योत मालवली. राजेश चौरे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन वर्षांच्या चिमुरड्याचे छत्र हरपले
मृत जय सकट हा कोविड काळानंतर महावितरण कंपनीत सेवेत रुजू झाला होता. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या जय याच्या अचानक जाण्याने सकट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि अवघ्या दोन वर्षांचा चिमुरडा मुलगा असा परिवार आहे. कमावता तरुण मुलगा गमावल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्यरात्रीपासून शॉर्ट सर्किट होत असताना पुरवठा खंडित (शटडाऊन) न करता दुरुस्तीचे काम सुरू होते का? की तांत्रिक त्रुटीमुळे अचानक वीजप्रवाह सुरू झाला, याचा तपास सुरू आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, याचा शोध घेण्यासाठी महावितरणकडून वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV