सध्याचे राजकारण गलिच्छ, सत्ताधाऱ्यांतच अंतर्गत शत्रू निर्माण होत आहेत – राज ठाकरे
मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करत सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते आजचे राजकारण अत्यंत गलिच्छ, भयानक आणि अस्वस्थ करणारे झाले असून विरोधक संप
Current politics is dirty Raj Thackeray


मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करत सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते आजचे राजकारण अत्यंत गलिच्छ, भयानक आणि अस्वस्थ करणारे झाले असून विरोधक संपवण्याच्या प्रयत्नातून अखेर सत्ताधारी पक्षांतर्गतच नवीन शत्रू निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज ठाकरे यांनी असा दावा केला की भारतीय जनता पक्षामध्येही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू झाली असून अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार आणि खासदारांच्या खरेदी-विक्रीच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नसून विकले जाणाऱ्यांचा आहे, कारण जर कोणी स्वतःहूनच देहविक्रीला तयार असेल तर त्यासाठी गिऱ्हाईक निर्माण होतातच. यावेळी त्यांनी सत्तेच्या स्थैर्याबाबतही भाष्य केले असून सत्तेचा अमरपट्टा कुणालाही मिळालेला नसतो, असे ते म्हणाले.

याच वेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत हे सर्व राजकारण त्यांच्या शैलीचे असल्याचा आरोप केला. त्यांनी शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना फोडून वेगळे गट निर्माण करण्याच्या राजकारणाचा उल्लेख करत भविष्यात सत्ता टिकवण्यासाठी विविध गटांचा वापर केला जात असल्याचे मत व्यक्त केले. तसेच पंतप्रधान पदाच्या राजकारणात अंतर्गत विरोध झाल्यास बाहेरील गटांचा आधार घेण्याची रणनीती असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्याचे भाजपचे राजकारण पत्त्याच्या उलट्या घरासारखे असून एक महत्त्वाचा आधार हलला तर संपूर्ण रचना कोसळू शकते, असे ते म्हणाले आणि या रचनेचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मतदार याद्यांच्या विशेष तपासणी (एसआयआर) प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून दरवर्षी नवीन मतदारांची नोंदणी होत असताना काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मते कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये लाखो मते वगळल्याचा आरोप करत त्यांनी यामागे मोठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. याचा परिणाम माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्यांच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

मुंबई आणि ठाणे शहरातील पावसाळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी शहर नियोजनातील कमतरता अधोरेखित केली. पहिल्याच पावसात पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होणे ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ विकास आराखडे तयार करून उपयोग नसून प्रत्यक्ष टाऊन प्लॅनिंग आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि बांधकाम प्रकल्पांवर भर देऊन शहरे उभी राहत नाहीत, तर दीर्घकालीन नियोजन आणि पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande