
- नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन- मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना
रायगड, 01 जुलै (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ ते ६ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकणासह घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणी रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून जात आहे. त्यामुळे कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असून विदर्भातही व्यापक पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात २ व ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढणार असून त्यानंतर तुरळक पावसाची शक्यता आहे.
कोकणात २ ते ४ जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच २ व ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४ ते ६ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागांत रस्ते जलमय होणे तसेच घाटरस्त्यांवर भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी हवामान आणि वाहतुकीची माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात खराब हवामानाची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भात व भाजीपाला पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)