रत्नागिरी : पावसाअभावी भातशेती करपल्याने शेतकरी हवालदिल
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । यावर्षीच्या पावसाच्या अनियमितपणामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी भातशेती करपली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, डोळ्यांदेखत सोन्यासारखे भाताचे पीक वाळून चालल्याने शेतकरी हवालद
रत्नागिरी : पावसाअभावी भातशेती करपल्याने शेतकरी हवालदिल


रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । यावर्षीच्या पावसाच्या अनियमितपणामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी भातशेती करपली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, डोळ्यांदेखत सोन्यासारखे भाताचे पीक वाळून चालल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी बियाणे पेरले होते. पण ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने कोकणातील शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. कडक उन्हाच्या झळांमुळे शेतातील माती कोरडी ठणठणीत पडली असून, डोलणारी कोवळी रोपे आता पिवळी पडून कोमेजून गेली आहेत.

गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना महापूर आला. मात्र या आठवड्यात पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोकणातील शेतकऱ्यांसाठी भातशेती हाच जगण्याचा मुख्य आधार आहे. वर्षभराची गुजराण याच पिकावर अवलंबून असते. मात्र डोळ्यांदेखत स्वप्नांची राखरांगोळी होत असताना पाहून शेतकरी चिंतित आहेत.

नेहमी गावाच्या सुखादुःखात खंबीरपणे उभे राहणारे कोंड्ये (ता. संगमेश्वर) गावचे माजी सरपंच आणि स्थानिक शेतकरी सुरेश दसम शेतात उभे राहून सुकलेली रोपे हातात घेताना अत्यंत भावुक झाले. आपल्या भागातील बळीराजाची ही दयनीय अवस्था मांडताना त्यांचाही कंठ दाटून आला. प्रशासनाचे लक्ष वेधताना ते आर्ततेने म्हणाले की, आम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी केले, पोराबाळांसारखे या पिकाला जपले. पण आता आकाशात ढग येत नाहीत आणि डोळ्यांतील पाणी थांबत नाही. पंपाने पाणी ओढायला जवळ नदीनालाही नाही. गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंब आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande