
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात १५ जुलै ते ता. १८ जुलै २०२६ या कालावधीत विविध आजारांवर महाशस्त्रक्रिया शिबिर' आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात प्रामुख्याने 'डायबेटिस फूट' (मधुमेहातील पायाच्या जखमा) या आजारवर अल्पदरात उपचार करण्यात येतील. तसेच लेसर प्रोक्टोलॉजी (गुदद्वाराशी संबंधित आजार) यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत व सवलतीच्या दरात अत्याधुनिक उपचार केले जाणार आहेत.
मधुमेहामुळे रुग्णांच्या पायाला गंभीर जखमा होण्याचा, सूज येण्याचा किंवा संसर्ग (इन्फेक्शन) होण्याचा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास पाय गमावावा लागण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पायावर बरी न होणारी जुनी जखम असणे, पायाला मुंग्या येणे, जळजळ होणे किंवा पाय बधिर पडणे. पायाला सूज येणे, पू होणे किंवा संसर्ग होणे अशा रुग्णांना या शिबिराचा फायदा होणार आहे.
या शिबिरानंतर १७ व १८ जुलै रोजी लेसर प्रोक्टोलॉजी उपचार शिबिर होणार असून सदर शिबिरात गुदद्वाराशी संबंधित आजारांवर आधुनिक लेसर उपचार केले जाणार आहेत. मूळव्याध (गुदद्वारातील सूज, रक्तस्राव व वेदना), फिस्टुला (गुदद्वाराजबळील नळी, पू येणे व वारंवार संसर्ग), फिशर (शौचाच्या वेळी तीव्र वेदना व रक्तस्राव) या आजारवर मोफत आधुनिक लेसर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ कोकणवासीयांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी