
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जुलै रोजी वेळापूर येथे मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांचे भव्य स्वागत करण्यासह त्यांना सर्व आवश्यक सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयातून पालखी सोहळा शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. सांगोला गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी सरतापे, पंचायत समिती सदस्या विमल जानकर, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, पोलिस उपनिरीक्षक प्रणित कांबळे, तलाठी सावता गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत पालखी मार्गाची स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी आरोग्य सेवा, अखंडित वीजपुरवठा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचे नियोजन तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी सरपंच रजनीश बनसोडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देत, आषाढी वारीच्या स्वागतासाठी वेळापूर प्रशासन सर्वतोपरी तयारीत असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड