
सोलापूर, 14 जुलै, (हिं.स.)। आईशक्ती फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहरातील आई-वडील दोघेही नसलेल्या तसेच आई किंवा वडील गमावलेल्या २ हजार विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू आणि अनाथ मुलींच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
वालचंद महाविद्यालयाजवळील लोटस सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, डॉ. अंबिका यावलकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे आणि अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी आईशक्ती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू विद्यार्थिनी आणि महिलांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील गरजू विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मदतीबरोबरच इतर सामाजिक उपक्रमही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी शासन आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आईशक्ती फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थिनींचे भविष्य घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड