
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.) : नीरा देवधर प्रकल्पातून वंचित गावांना पाणी मिळावे, यासाठी माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या मागणीला गती मिळाली आहे. या मागणीसाठी सादर करण्यात आलेल्या ११ हजार सह्यांच्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत नीरा देवधर योजनेत मूळ समाविष्ट असलेल्या १२ गावांच्या कामांच्या निविदा (टेंडर) पुढील दोन महिन्यांत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पुढाकारातून माळशिरस तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या ११ वर्षांपासून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणारे शिवराज पुकळे यांनाही विशेष निमंत्रित म्हणून बैठकीस उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली.
नीरा देवधर योजनेत मूळ समाविष्ट असलेल्या कारुंडे, पिंपरी, लोणंद, रेडे, गिरवी, मांडवे, मांडकी, कण्हेर, इस्लामपूर, भांबुर्डी, गोरडवाडी आणि मोटेवाडी या १२ गावांसाठी दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १६ गावांच्या कामांसाठीही दोन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या नव्याने समाविष्ट गावांमध्ये सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, पिलीव, कोळेगाव, जळभावी, गारवाड, मगरवाडी, कोथळे, भांब, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, काळमवाडी आणि चांदापुरी यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे माळशिरस तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यातील एकूण २८ गावांना नीरा देवधर प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड