
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १५ ते २९ जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.आषाढी शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा २५ जुलै रोजी होत असून यात्रेचा कालावधी १५ ते २९ जुलै असा आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू करण्यात आला आहे.याशिवाय, आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांचा करकंब (ता. पंढरपूर) येथे मुक्काम होत असल्याने त्या परिसरातही विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करकंबसह पांढरेवाडी, व्होळे, देवडे आणि खेडभोसे या गावांमध्ये २० ते २५ जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे.करकंब परिसरात यात्रेदरम्यान लाखो वारकरी आणि भाविक मुक्कामी असतात. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांसह भाविकांकडून मांस-मटण विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था आणि धार्मिक वातावरण लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड