
बीड, 16 जुलै (हिं.स.) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा–पाटोदा मार्गावरील मुळुकवाडीजवळ गुरुवारी (दि. 16) पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव पिकअपने रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या दोन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये ईश्वर गणेश ढगारे (वय 16) आणि राज बिरूदेव ढगारे (वय 16) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-16 डीपी-2245 क्रमांकाची जनावरे वाहून नेणारी पिकअप भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिली. धडकेनंतर पिकअप रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.
या अपघातात वाहनातील जनावरांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी सरपंच कृष्णा पितळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis