शेतकऱ्यांच्यासाठी 20 जुलैपासून बालाजी पाटील चाकूरकरांचे बेमुदत उपोषण
लातूर, 16 जुलै (हिं.स.) : चाकूर तालुक्यातील मनरेगा योजनेतील कथित भ्रष्टाचार, प्रलंबित देयके, पिक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे शेतकऱ्यांसह 20 जुलै 2026 (सोमवार) पासून चाकूर येथील जुन्या बसस्थान
बालाजी पाटील चाकूरकर


लातूर, 16 जुलै (हिं.स.) : चाकूर तालुक्यातील मनरेगा योजनेतील कथित भ्रष्टाचार, प्रलंबित देयके, पिक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे शेतकऱ्यांसह 20 जुलै 2026 (सोमवार) पासून चाकूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील कमानीजवळ आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी अविनाश जाधव, मुरलीधर माने, गोविंद गवळी, पंढरी हादवे, सुरेश कांबळे, तुकाराम कोरके, राम कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी चाकूरकर यांनी सांगितले की, चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी शासन आणि प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी प्रमुख मागण्या मांडताना सांगितले की, चाकूर तालुक्यातील 84 गावांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. मनरेगाअंतर्गत विहिरी, गोठे, घरकुले, शेततळे आणि पानंद रस्ते आदी पूर्ण झालेल्या कामांची गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेली देयके तात्काळ लाभार्थ्यांना अदा करण्यात यावीत. तसेच चाकूर, अहमदपूर आणि शिरूर अनंतपाळसह राज्यातील नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही मनरेगा योजनेचा लाभ लागू करण्यात यावा.

याशिवाय, चाकूर, अहमदपूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा 2025-26 या वर्षाचा पिक विमा तातडीने मंजूर करून वितरित करावा तसेच विविध योजनांअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित बिले त्वरित अदा करावीत, अशीही मागणी त्यांनी केली.

या संदर्भात मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अद्याप प्रत्यक्ष चौकशी पूर्ण झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार बालाजी पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande