
नांदेड, 23 जुलै (हिं.स.)।
शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – आमदार भीमराव केराम
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' अंतर्गत किनवट येथील गोकुंदा रोडवरील एन. के. गार्डन येथे भव्य महाशिबिर उत्साहात पार पडले.
महसूलसह विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्याने शेकडो नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला, तर अनेकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले.
महाशिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव रामजी केराम होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बी. सरवनन तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महाशिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, महावितरण, भूमी अभिलेख, परिवहन, पशुसंवर्धन, सहकार आदी विभागांच्या माध्यमातून उत्पन्न, जात व निवासी दाखले, विविध प्रमाणपत्रे, अर्ज स्वीकारणे, तक्रार निवारण, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन अशा विविध सेवा देण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला, तर अनेक नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडविल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भीमराव केराम म्हणाले, राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला कोणत्याही अडथळ्याशिवाय शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून एकाच छताखाली नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या महाशिबिराचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
महाशिबिरादरम्यान नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती घेतली, आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज दाखल केले तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis