
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। शासनाच्या अनेक योजना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान आली लोकाभिमुख करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम करत आहे.असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी केले.
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा मुरुम नगरपालिकेचे अध्यक्ष बापुराव पाटील,शरद पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाआरोग्य शिबिराचे संयोजक श्री.शरण पाटील,उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,लोहारा उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे,उमरगा तहसीलदार गोविंद येरमे,लोहारा तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर,तसेच जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व नगर पालिका सदस्यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
आमदार श्री.पाटील म्हणाले की, राज्याने विविध क्षेत्रात आघाडी घेतली आहे.शेती हा राज्याचा मुख्य व्यवसाय आहे. महसूलमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेत रस्त्यांसाठी शेतकरी बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे.या योजनेची सुरुवात राज्यात उमरगा तालुक्यापासून झाली.राज्यात ही योजना आता सर्वत्र प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेमुळे शेतमाल शेतातून थेट बाजारपेठेत पोहोचत आहे.आरोग्य व शेतरस्त्याच्या बाबतीत उमरगा तालुक्यात चळवळ सुरू केली आहे.शेतकरी हितासाठी ही चळवळ सुरू आहे.जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी प्रशासन गतिमान करण्यासाठी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात योजनांच्या अंमलबजावणीला गती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यातून उमरगा तालुका पुढे येत असल्याचे सांगून आमदार श्री.पाटील पुढे म्हणाले की,१०० खाटांचे महिला रुग्णालय उमरगा येथे झाले पाहिजे ही मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. शेतरस्त्यांच्या तसेच दोन्ही तालुक्यांतील रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.त्यासाठी नीतीची तरतूद करण्यात येईल.शासनाच्या विविध योजना नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचविण्यात येतील यापुढे तालुक्याची सेवा सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे श्री.पाटील यावेळी म्हणाले.
या शिबिरात भूमी अभिलेख विभाग,महसूल विभाग,मुख्यमंत्री सहायता कक्ष,नाक कान घसा तपासणी,अस्थिरोग तपासणी, हृदयरोग,शल्य चिकित्सा,नेत्र विभाग,महसूल विभागाचा संजय गांधी निराधार योजना,पुरवठा विभाग,आधार प्रमाणीकरण, एस.टी.महामंडळ,पोलीस विभागाचा सायबर सेल व महिला सुरक्षा माहिती,सरकारी कामगार अधिकारी,पोस्ट विभाग,कृषी विभाग,समाज कल्याण विभाग, नगरपरिषद,पशुसंवर्धन,पंचायत विभाग,हरित धाराशिव सामाजिक वनीकरण विभाग,मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व औषध वितरण कक्ष असे विविध स्टॉल लावण्यात आले.विविध स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेटी देऊन योजनांची माहिती जाणून घेऊन संबंधित विभागांची माहिती पत्रके घेतली.
यावेळी मंचावरून मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे, धनादेश तसेच आवश्यक दस्तावेज वाटप करण्यात आले.प्रास्ताविक उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले.उपस्थितांचे आभार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मानले.
नागरिकांनी महाआरोग्य शिबिरातून आपली आरोग्य तपासणी मोठ्या संख्येने करून घेतली.या महासमाधान शिबिराला उमरगा व लोहारा तालुक्यातील नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis