
पुणे, 23 जुलै (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापालिका सभेत शहरातील क्रीडा सुविधा, स्वच्छता, आरोग्य, जलनिःसारण, सार्वजनिक सुविधा, माहिती-तंत्रज्ञान, स्मशानभूमी, रुग्णालय विकास तसेच विविध पायाभूत विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देणे, सुरू असलेल्या विकासकामांना गती देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये सातत्य राखणे या उद्देशाने विविध विषय सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आले. सभेत मासुळकर कॉलनी येथील महापालिकेची व्यायामशाळा क्रीडा धोरणानुसार सेवाशुल्क तत्त्वावर ११ महिन्यांसाठी सिंहगर्जना मित्र मंडळ या संस्थेकडे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच सुधारित क्रीडा धोरण लागू झाल्यानंतर त्यातील सर्व अटी संबंधित संस्थेस बंधनकारक राहतील, अशी तरतूदही प्रस्तावात करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर व स्टिकर्स तयार करण्यासाठी झालेल्या खर्चास मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. तसेच स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, वॉटर प्लस, सेवन स्टार रेटिंग, आरआरआर सेंटर्स, आयसीसीसी डॅशबोर्ड, नवी दिशा उपक्रम आणि झिरो वेस्ट स्लम मॉडेल यांसारख्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी मराठी माहितीपट तयार करण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला. अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत व गॅस दाहिनीची देखभाल आणि संचालन अखंडित सुरू राहावे यासाठी विद्यमान कामास मुदतवाढ देणे, आवश्यक वाढीव खर्चास तसेच सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला. ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प किवळे, नागसेननगर आणि रमाबाईनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राप्त निविदेस मंजुरी देऊन संबंधित ठेकेदारास काम देण्याबाबत विचार करण्यात आला. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी गावठाण परिसरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छता आणि देखभालीचे काम करणाऱ्या महिला बचत गटांना पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचे प्रस्तावही सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु