हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
बीड, 26 जुलै, (हिं.स.) - हातभट्टीची दारू तयार करून तिचा चोरटा व्यापार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून त्याची थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बाबासाहेब रुपचंद आडे (वय ४६, रा. राडी तांडा, ता. अंबाजोग
एमपीडीए


बीड, 26 जुलै, (हिं.स.) - हातभट्टीची दारू तयार करून तिचा चोरटा व्यापार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून त्याची थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बाबासाहेब रुपचंद आडे (वय ४६, रा. राडी तांडा, ता. अंबाजोगाई) असे या सराईत आरोपीचे नाव आहे.

आरोपी बाबासाहेब आडे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात हातभट्टीची दारू तयार करणे, जवळ बाळगणे, चोरटी विक्री व वाहतूक करणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. यापैकी चार गुन्हे न्यायप्रविष्ट असून दोन गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो पोलिसांना न जुमानता पुन्हा अवैध व्यवसाय करत होता. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी २३ जुलै रोजी स्थानबद्धतेचे आदेश पारित केले. त्यानुसार २५ जुलै रोजी दुपारी आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक हृषीकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, सहायक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हवालदार देशमाने, घोळवे, महिला पोलीस अंमलदार ज्योती कापले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू औताडे, गोविंद भताने, रामचंद्र केकाण यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande