बीड पोलिस जमिनीचे आणि कौटुंबिक वाद गंभीर गुन्ह्यांत रूपांतरित होण्यापूर्वीच रोखणार
बीड, 26 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हा पोलीस दलाने जमिनीचे आणि कौटुंबिक वाद गंभीर गुन्ह्यांत रूपांतरित होण्यापूर्वीच रोखण्यासाठी ''पोलीस आपल्या बांधावर'', ''भरोसा सेल'' आणि ''सुगम संपर्क अभियान'' या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे.
भरोसा सेल


बीड, 26 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हा पोलीस दलाने जमिनीचे आणि कौटुंबिक वाद गंभीर गुन्ह्यांत रूपांतरित होण्यापूर्वीच रोखण्यासाठी 'पोलीस आपल्या बांधावर', 'भरोसा सेल' आणि 'सुगम संपर्क अभियान' या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस थेट नागरिकांच्या बांधावर आणि घरापर्यंत पोहोचून वादांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणार आहेत, जेणेकरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील.

बीड पोलिसांनी नुकत्याच केलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारण विश्लेषणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात घडलेल्या एकूण गंभीर गुन्ह्यांपैकी सुमारे २६ टक्के गुन्हे हे जमीन, शेत, बांध आणि पाणी यांसारख्या शेतीविषयक वादांतून घडले आहेत. याशिवाय, तब्बल १६ टक्के गुन्हे हे कौटुंबिक आणि वैवाहिक मतभेदांमधून निर्माण झाले आहेत. अनेकदा हे छोटे वाद वेळीच न सोडवल्याने त्याचे रूपांतर मारहाण किंवा खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर घटनांमध्ये होते.

या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीड पोलिसांनी 'पोलीस आपल्या बांधावर' ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी थेट शेतात जाऊन महसूल विभागाच्या मदतीने वाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न करतील. तसेच, पती-पत्नी किंवा घरातील इतर सदस्यांमधील तणाव कमी करण्यासाठी 'बीड भरोसा सेल'मार्फत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना या सेवेशी थेट संपर्क साधता येईल. यासोबतच 'सुगम संपर्क अभियान' अंतर्गत नागरिकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणत्याही समस्येवर वेळीच योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास अनेक गंभीर गुन्हे टाळता येऊ शकतात आणि सुरक्षित, गुन्हेमुक्त समाज घडवता येऊ शकतो.अंबाजोगाईसह संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी किरकोळ वादातून कायदा हातात न घेता संवादातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande