
बीड, 26 जुलै (हिं.स.)। जुनी तारण असलेली मालमत्ता पुन्हा तारण दाखवून माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची सुमारे ४५ लाख ४ हजार ६५० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश रामप्रसाद झंवर (वय ५९, रा. मोंढा परळी) यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी नकुल नंदकिशोर जोशी यांनी २०१९ मध्ये वडील नंदकिशोर जगन्नाथ जोशी यांच्या मालकीच्या घराची इसार पावती देऊन पतसंस्थेकडून टप्प्याटप्प्याने कर्ज घेतले होते. त्यानंतर २०२१ मध्ये नकुल जोशी यांनी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जासाठी नकुल यांची पत्नी भाग्यश्री नकुल जोशी आणि आई वालीबाई नंदकिशोर जोशी (सर्व रा. परळी वै.) या जामीनदार राहिल्या. कर्ज घेतल्यानंतर काही दिवस व्याज भरल्यानंतर आरोपींनी हप्ते भरणे बंद केले. वसुली अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेने चौकशी केली असता, तारण दिलेली मालमत्ता २०१७ मध्येच दुसऱ्या क्रेडिट सोसायटीकडे गहाण ठेवलेली असल्याचे निष्पन्न झाले. जुने तारण लपवून बनावट इसार पावतीद्वारे पतसंस्थेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis