परभणी - रायझिंग मेन पाइपलाइन दुरुस्ती पूर्ण; सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत
परभणी, 26 जुलै (हिं.स.)। परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरप
परभणी - रायझिंग मेन पाइपलाइन दुरुस्ती पूर्ण; सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत


परभणी, 26 जुलै (हिं.स.)।

परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे जल अभियंता तन्वीर बेग यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, गौतमनगर परिसरात मुख्य रायझिंग मेन पाइपलाइन फुटल्याने गेल्या आठवड्यापासून परभणी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून आता जलवाहिनीची चाचणी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

जल अभियंता तन्वीर बेग यांनी सांगितले की, ही जुनी सीआय (Cast Iron) पाइपलाइन असल्याने दुरुस्ती करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सुरुवातीला डीआय (Ductile Iron) पाइप बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पाइपचा व्यास जुळत नसल्याने तो पर्याय शक्य झाला नाही. तसेच पाइपलाइन काही ठिकाणी घरांच्या खाली असल्याने काम अधिक जिकिरीचे ठरले.यानंतर नागपूर येथील तज्ज्ञांना पाचारण करून एमएस (Mild Steel) तंत्रज्ञानाद्वारे दुरुस्ती करण्यात आली. यासाठी आवश्यक साहित्य छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर येथून तातडीने मागविण्यात आले. साहित्य उपलब्ध होताच महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम पूर्ण केले.

परभणी शहराला येलदरी धरणातून धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र व राहटी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मुख्य रायझिंग मेन पाइपलाइन फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत नागरिकांनी या काळात दाखविलेल्या संयम व सहकार्याबद्दल आभार मानले. सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावेळी जल अभियंता तन्वीर बेग, शेख इस्माईल, हेमंत दापकेकर, बालाजी सोनुले, राहुल दुथडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande