
रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.) । अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रचीतगडाचे संवर्धन आणि विकासासाठी संगमरत्न फाउंडेशनने सिंधुरत्न योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांना पत्र लिहून काही मागण्या मांडल्या आहेत.
संगमरत्न फाउंडेशन ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था वर्षभरापासून प्रचीतगडावर सातत्याने स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान गडावरील अनावश्यक गवत आणि झाडेझुडपे काढल्यानंतर, त्याखाली दडलेला मौल्यवान ऐतिहासिक ठेवा प्रकाशात येत आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेला हा किल्ला कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा आहे. तथापि सध्या या गडाची आणि तेथे जाणाऱ्या मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याकडे संगमरत्न फाउंडेशनने डॉ. नातू यांचे लक्ष वेधले आहे.
प्रचीतगड किल्ला रत्नागिरी (संगमेश्वर), सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. तो चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिम टोकावर आहे.. ३,१८७ फूट उंचीवर असलेला हा गिरीदुर्ग कठीण श्रेणीमध्ये असून पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक शृंगारपूर गावापासून गडावर पोहोचण्यासाठी सुमारे ५ तास लागतात. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ एकर असून लांबी ६०० फूट व रुंदी ३०० फूट असल्याचे गॅझेटीयरमध्ये म्हटले आहे. (सातारा सर /५४३-४५), घनदाट जंगल, निसरड्या वाटा आणि मोठी चढण यामुळे हा ट्रेक दमवणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि हिंदवी स्वराज्यातील अनेक शूरवीरांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रचीतगड दुर्गमतेमुळे काहीसा उपेक्षित राहिला आहे. परिणामी या गडावरील ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने वेळीच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
यासंदर्भात संगमरत्न फाउंडेशनने केलेल्या काही मागण्या अशा - गडाकडे जाणारी पायवाट अनेक ठिकाणी निसरडी झाली असून, ती काही ठिकाणी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संस्थेने ठिकठिकाणी नायलॉनचे दोर लावण्यात आहेत. त्यामुळे चढाईदरम्यान मदत होईल. दुर्गप्रेमी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या वाटांची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. गडावर जाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पायऱ्यांची दुरुस्ती किंवा सुरक्षित मार्ग तयार केल्यास पर्यटनाला चालना मिळेल. गडावरील तटबंदी, बुरूज, दरवाजा, वाड्यांचे जोते यांचे जतन आणि पाण्याचे टाके गाळाने भरले असून त्याची पडझड होत आहे. पुरातत्त्व खात्यामार्फत या वस्तूंचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. गडाच्या पायथ्याशी व मार्गांवर दिशादर्शक व ऐतिहासिक माहितीचे फलक लावण्यात यावेत. सध्या संगमरत्न फाउंडेशनकडून काही दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. शासनाकडून अधिकृत सूचना/माहिती फलक लावल्यास पर्यटकाना अधिक माहिती मिळण्यास मदत होईल. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूर किंवा नजीकच्या वस्तीवर जिल्हा नियोजन समिती किंवा एमटीडीसीमार्फत सुसज्ज पर्यटक निवास उभारण्यात यावा. गडावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि माहिती केंद्र उभारल्यास पर्यटकांचा ओघ वाढून परिसराचा विकास होईल. किल्ल्यावर मुक्कामासाठी येणाऱ्या ट्रेकर्सना आणि रात्री गडावर असणाऱ्यांना अंधारामुळे मोठ्या अडचणी येतात. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मुख्य वास्तूंच्या परिसरात सौरदिवे लावल्यास रात्रीची सुरक्षा वाढेल आणि वन्य प्राण्यांपासून होणारा धोका कमी होईल. प्रचीतगडाची चढण अनेक ठिकाणी अतिशय अरुंद आणि खोल दरीच्या कडेने जाणारी आहे. पावसाळ्यात किंवा निसरड्या वाटेवर अपघात होण्याची शक्यता दाट असते. गडाच्या धोकादायक वळणांवर आणि कड्याच्या बाजूला लोखंडी संरक्षक कठडे बसवल्यास पर्यटकांचा प्रवास सुरक्षित होईल. या मागण्यांचे निवेदन डॉ. नातू यांना देण्यात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी