रत्नागिरी पोलीस दलातील होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण
रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच विविध पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले. जिल्हा पोलीस अध
रत्नागिरी पोलीस दलातील होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण


रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच विविध पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही होमगार्ड जवान सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त, विविध संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित, कार्यक्षम व अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावता यावे, या उद्देशाने रेनकोटचे वितरण करण्यात आले.

बैठकीदारम्यान, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत, पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी होमगार्ड जवानांच्या योगदानाचे कौतुक करत, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पावसाळ्यात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत जबाबदारीने व दक्षतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande