रत्नागिरी : विषमुक्त शेतीसाठी सोमवारी 'गोकृपा अमृत'विषयक ऑनलाइन वेबिनार
रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.) । हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची घटलेली सुपीकता सुधारण्यासाठी ''गोकृपा अमृत सूक्ष्मजीव कल्चर'' हा नैसर्गिक शेतीतील प्रभावी पर्याय ठरत असून या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सोमवारी, दि.
रत्नागिरी : विषमुक्त शेतीसाठी सोमवारी 'गोकृपा अमृत'विषयक ऑनलाइन वेबिनार


रत्नागिरी, 26 जुलै (हिं.स.) । हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची घटलेली सुपीकता सुधारण्यासाठी 'गोकृपा अमृत सूक्ष्मजीव कल्चर' हा नैसर्गिक शेतीतील प्रभावी पर्याय ठरत असून या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सोमवारी, दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकृपा अमृतमध्ये १३८ हून अधिक लाभदायक सूक्ष्मजीव असून ते जमिनीची सुपीकता वाढविण्यास, पोषकतत्त्वांची उपलब्धता सुधारण्यास आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते. हे द्रावण शेतकरी घरच्या घरी सहज तयार करू शकतात. ठिबक सिंचन, फवारणी तसेच सेंद्रिय खतांच्या गुणवत्तावाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. या तंत्रज्ञानामुळे मातीचा पोत सुधारतो, पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. तसेच पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

याविषयीची माहिती देण्यासाठी बन्सी गीर गोशाळा (अहमदाबाद) आणि विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वेबिनारमध्ये बन्सी गीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया नैसर्गिक शेती, गोकृपा अमृत तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी तसेच नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीत रस असलेल्या युवकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे. वेबिनारची लिंक आणि क्यूआर कोड नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी विभागामार्फत गोकृपा अमृत कल्चर मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande