ठाण्यातील पंप हाऊसचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे, 26 जुलै (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील इंदिरानगर, येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊ
Thane


ठाणे, 26 जुलै (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील इंदिरानगर, येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया, एकता भोईर, योगेश जानकर, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

इंदिरानगर येथील संप येथून ३१ एमएलडी आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून २१ एमएलडी अशा एकूण ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी २०१८ मध्ये एमआयडीसीकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारता आली.

या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतिनगर, वारली पाडा, रामनगर, किती तलाव, जुना गाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे.

नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande