
ठाणे, 26 जुलै (हिं.स.)। NEET आणि CBSE परीक्षांतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरला होता. अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC)च्या नेतृत्वाखाली उभारलेल्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी 'विद्यार्थी विजय मार्च' काढण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आयोजित या मार्चचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. ठाणे शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयातून सुरू झालेला मार्च स्टेशन रोड, अशोक टॉकीज, ठाणे एसटी स्थानक, ठाणे रेल्वे स्थानक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला. यावेळी पेपरफुटीच्या प्रकरणामुळे तणावाखाली येऊन मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असताना केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मौन बाळगले. लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा आवाज देशभर बुलंद करत जिल्हा ते दिल्लीपर्यंत आंदोलनांची साखळी उभारली. जनआक्रोश आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
या आंदोलनात मा.खा.कुमार केतकर,धर्मराज्यचे राजन राजे, प्रदेश पदाधिकारी विश्वास उटगी,गजानन देसाई,प्रदीप राव,मधु मोहिते,मोहन तिवारी ,समता विचार प्रचारक संस्था,NAPM, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भारत जोडो अभियान सह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस चे प्रदेश सदस्य, ब्लॉक अध्यक्ष, सेल अध्यक्ष व सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
________________________
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारला अखेर जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे झुकावे लागले. हा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर लाखो विद्यार्थी, पालक आणि न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्रपणे सुरू राहील.
राहुल पिंगळे (ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष)
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर