
मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात कॉकरोच जनता पार्टीने छेडलेल्या आंदोलनानंतर देशभरात मोठं वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनाला विद्यार्थ्यांसह विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल ३६ ते ३७ दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर २५ जुलै रोजी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. या संपूर्ण घडामोडींमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला संबोधित करत शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.
या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला आणि लोकशाहीने त्याची दखल घेतली, याचं स्वागत केलं. मात्र आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरण्यात आलेल्या अपमानास्पद आणि अश्लील भाषेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनुपम खेर म्हणाले की, आंदोलन संपलं असून अनेक गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. विद्यार्थी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडतात तेव्हा लोकशाही त्यांचं म्हणणं ऐकते, हे या आंदोलनातून सिद्ध झालं आहे. संवाद वेळेत झाला असता तर परिस्थिती इतकी टोकाला गेली नसती. अखेरीस प्रश्नावर तोडगा निघाला आणि हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी देशाला आता पुढे जाण्याची गरज असल्याचं नमूद केलं. एका आंदोलनामुळे देश कायम ठप्प राहू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पुढे जाणं आवश्यक आहे. मात्र या संपूर्ण आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविषयी जाहीर मंचावर आणि कॅमेऱ्यासमोर वापरली गेलेली खालच्या पातळीची भाषा पाहून स्वतःला मोठं दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही नेत्याच्या निर्णयांशी असहमती असू शकते, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणं हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा आदर राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले. विरोध असावा, मतभेद असावेत, पण ते व्यक्त करताना भाषेची मर्यादा पाळणं तितकंच आवश्यक आहे. शेवटी एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या नेत्यांवरून होत नाही, तर त्या देशातील नागरिकांच्या भाषा, संस्कार आणि वर्तनावरून ठरते. मतांमध्ये भिन्नता असली तरी मनांमध्ये दुरावा नसलेला भारत घडवणं हीच काळाची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule