
जालना, 27 जुलै (हिं.स.)। सामाजिक वनीकरण विभाग, जालना यांच्या वतीने आयोजित वन महोत्सव अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लावलेले प्रत्येक झाड जगविण्याची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
वन महोत्सवाच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे भविष्यात पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्याबरोबरच नागरिकांना स्वच्छ हवा आणि निसर्गसंपन्न वातावरणाचा लाभ होणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आंबोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis