
लातूर, 28 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी आणि मतदार यादी विशेष पडताळणी (एसआयआर) मोहिमेचा आढावा घेण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस भवन येथे आठवी महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत बोलताना रेहाना चिश्ती यांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात सक्रिय होण्याचे आवाहन केले. मतदार यादी पडताळणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक पात्र मतदाराचा लोकशाहीतील हक्क अबाधित ठेवण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक बीएलए आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, यासाठी डोळ्यात तेल घालून काम करा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या भव्य कॅन्डल मार्चचे विशेष कौतुक करत, या उपक्रमामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे नमूद केले.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. मतदार यादी पडताळणी मोहीम ही लोकशाही मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असून प्रत्येक मतदाराचा हक्क अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी अधिक जबाबदारीने, सूक्ष्म नियोजन करून काम करावे, असे ते म्हणाले. बैठकीच्या प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी शहर काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा सादर केला. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी यापूर्वीच्या निवडणुकांतील यशाचा उल्लेख करत आगामी काळात संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
लातूर शहराचे बीएलए-१ डॉ. दिनेश नवगिरे यांनी शहरातील मतदार यादी पडताळणी मोहिमेचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया, बूथनिहाय कामाची सद्यस्थिती याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील बीएलए, तालुकाध्यक्ष, शहर व जिल्ह्याच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनीही आपापल्या कार्याचा अहवाल सादर केला. बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करणारा अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis