यवतमाळ - मतदार यादीच्या कार्यक्रमाला ‘ब्रेक’; निवडणूक आयोगाचे आदेश
यवतमाळ, 28 जुलै (हिं.स.) जिल्ह्यात नव्याने आणि २०२४ ते २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या अशा मिळून ९७२ ग्रामपंचायतच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला होता. सरपंच, सदस्य आरक्षण आटोपले होते. तर मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमालासुद्धा ‘ग्रीन सिग
मतदार यादीच्या कार्यक्रमाला ‘ब्रेक’ निवडणूक आयोगाचे आदेश; ग्रामपंचायत निवडणुकीच्या शक्यतेला विराम


यवतमाळ, 28 जुलै (हिं.स.) जिल्ह्यात नव्याने आणि २०२४ ते २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या अशा मिळून ९७२ ग्रामपंचायतच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला होता. सरपंच, सदस्य आरक्षण आटोपले होते. तर मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमालासुद्धा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला होता. मात्र, मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर) सुरू असल्यामुळे मतदार यादी कार्यक्रमाला विराम देण्यात आला आहे. यासंदर्भातचे निवडणूक आयोगाचे आदेश धडकले आहे.

जिल्ह्यातील २०२४ ते २०२६ या कालावधीत ९७२ ग्रामपंचायतची मुदत संपुष्टात आली आहे. तर नव्याने ४० ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. दरम्यान, ९७६ ग्रामपंचायतीतील जवळपास साडेआठ हजारांवर सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमसुद्धा आटोपला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली होती. त्यात १५ एप्रिल २०२६ ला अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुदत संपलेल्या आणि नव्याने निर्मिती ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करून शुक्रवारी (ता. २४) प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तर आक्षेप व हरकती घेऊन सुनावणीअंती चार ऑगस्ट २०२६ ला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. या कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासन कामालासुद्धा लागले होते. त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोंबर ह्या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुका लागण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या एसआयआरच्या कामात संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे. मतदार यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.या कालावधीत ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे बहुतांश जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांनी ग्रामपंचायतच्या मतदार याद्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतची प्रारूप मतदार यादी तूर्त प्रसिद्ध करू नये, असे आदेश दिले. तसेच सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आता मात्र, सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता अत्यंत धुसर झाली आहे.

इच्छुकांचा हिरमोड सरपंच,

सदस्य आरक्षण निघाल्यानंतर अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली होती. वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचे काम केल्या जात होते. आता मात्र निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आतापर्यंत केलेले संपूर्ण कामे पाण्यात गेली असून, निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा नव्याने सुरवात करण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर येण्याची शक्यता आहे.

प्रक्रिया थंडबस्त्यात पडण्याची शक्यता

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि नव्याने निर्मित ९७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांचे आरक्षणासह मतदार यादी कार्यक्रमाच्या टप्प्यावर पोचला होता. तसेच निवडणुकीच्या पूर्व तयारीसंदर्भातचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर यंत्रणेशी समन्वय साधून तातडीने सादर करावा, असे आदेश निवडणूक आयोगाकडे दिले होते. मात्र, आता मतदार यादी कार्यक्रमच थांबविण्यात आल्यामुळे सध्यातरी संपूर्ण प्रक्रिया थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande