
परभणी, २८ जुलै (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने आषाढी वारी २०२६ दरम्यान लाखो वारकरी भाविकांना सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. 'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत आजपर्यंत ७ लाख २३ हजार ८२ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीदरम्यान वारकरी भाविकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारत पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभारली. यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स आणि 'आरोग्यसंपन्न वारी' या डिजिटल ॲपचा वापर करून आरोग्य सेवा अधिक गतिमान व तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या.
वारकरी भाविकांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, दोन दिवसीय महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान तसेच व्यापक आरोग्य जनजागृती यांसारख्या विविध सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजपर्यंत ७ लाख १८ हजार ६३५ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले असून ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली आहे. तसेच १ हजार ५३३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. विविध आजारांवरील वेळेवर तपासणी व उपचारांमुळे वारकरी भाविकांना तातडीची आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis