
बगदाद, 28 जुलै (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेला भीषण संघर्ष अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, इराणने उत्तर इराकमधील एर्बिल येथे मंगळवारी पहाटे अनेक ड्रोन हल्ले केले. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळही अनेक स्फोट झाले. या भागातील विविध ठिकाणांना इराणी ड्रोनने लक्ष्य केले आहे.
ताज्या घडामोडींनुसार, उत्तर इराकमधील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले असून आकाशात लढाऊ विमाने उड्डाण करताना दिसली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रोन हल्ले इराणकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, किमान चार इराणी ड्रोननी उत्तर इराकमधील खलिफान आणि सोरान परिसरासह एरबिलच्या ईशान्येकडील भागांना लक्ष्य केले.या हल्ल्यांनंतर संबंधित भागांत मोठ्या प्रमाणात आग लागली, तर दोन ड्रोन कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर एरबिलच्या आकाशात १० हून अधिक अमेरिकन लढाऊ विमाने आणि ड्रोन उड्डाण करताना दिसल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी रात्री इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशाची राजधानी एरबिल येथे अनेक जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, शहरात किमान सात स्फोट झाले असून त्यापैकी काही अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या परिसरातही झाले. या प्रकरणात इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम संस्थेने दावा केला आहे की इराकच्या अल-अनबार प्रांतात एक अमेरिकन ड्रोन पाडण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनी हदीथा धरणाजवळ कोसळलेल्या अमेरिकन ड्रोनची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. मात्र, या दाव्याची अद्याप अमेरिकन किंवा इराकी अधिकाऱ्यांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या हल्ल्यांबरोबरच उत्तर आणि पश्चिम इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचालीही दिसून आल्या आहेत. वृत्तानुसार, सुलेमानियाह येथील खोर मोर वायूक्षेत्रावरही हल्ला करण्यात आला आहे.
या घटनांनंतर आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांचे आणि तज्ज्ञांचे मत आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील संवादात अडथळे निर्माण झाल्यास प्रादेशिक शांतता तसेच जागतिक व्यापारमार्ग धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode