अमरावती पोलिसांकडून 377 हरवलेले व चोरीचे मोबाईल मालकांना परत
अमरावती, 28 जुलै (हिं.स.)अमरावती शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी 2026 या वर्षात हरवलेले, चोरीला गेलेले तसेच लुटलेले तब्बल 377 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित नागरिकांना
अमरावती पोलिसांची मोठी कामगिरी; 377 हरवलेले व चोरीचे मोबाईल मालकांना परत


अमरावती, 28 जुलै (हिं.स.)अमरावती शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी 2026 या वर्षात हरवलेले, चोरीला गेलेले तसेच लुटलेले तब्बल 377 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले.

CEIR (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलच्या मदतीने सायबर पोलीस ठाणे आणि अमरावती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत 66 लाख 63 हजार 800 रुपये इतकी आहे. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारे अमरावतीसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच इतर राज्यांतूनही हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनीकेत कसार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती भरावी. तसेच ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 किंवा सायबर क्राइम पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस विभागामार्फत कऱण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande