
लातूर, 28 जुलै (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीच्या मोटारसायकलींबाबत महत्त्वाची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा, अहमदपूर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा तसेच इतर ठिकाणच्या गुन्ह्यांतील एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे.
या कारवाईमुळे वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, इतर गुन्ह्यांच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर तथा संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संजय फुलारी, राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis